SAMRAT

Testimonials

 

मराठी मित्र मंडळ एडींगबर्ग (MMM-E)


               वर्ष सरायला लागले की ओढ लागते ती नव वर्षाची आणि मागोवा घेतला जातो गतवर्षात घडलेल्या घटनांचा.मी ही असाच एक थोडासा प्रयत्न केला वर्षभरातल्या आठवणी ताज्या करण्याचा आणि काही ठराविक गोष्टी सापडल्या.


त्यातली एक -


              मी यंदाच्या वर्षी कामानिमीत्त स्काॅटलंडच्या एडींगबर्ग  शहरात होतो. तसं हे शहर मला नविन नव्हतं कारण मी यापुर्वी ही येवुन गेलेलो होतो. पण हे वर्ष जरास वेगळं होतं. कारण ह्या वेळेस मला भेटलेलं मराठी मित्र मंडळ आणि त्यातली मंडळी. 


             इथे मी आलो ते वर्षाच्या सुरुवातीला त्यामुळे सगळे सण , उत्सव इथेच साजरे करावे लागणार होते. एक एक सण येवु लागले आणि ते कीती उत्साहात साजरे होतात याची प्रचिती येवु लागली. 

            सर्व प्रथम आला तो गुढीपाडवा-हिंदु नववर्षाचा पहिला दिवस. मंदिरात त्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला गेला आणि तो ही अगदी मराठमोळ्या पध्दतीने. उंच अशी गुढी उभारली होती. त्याची मग पुजा झाली. गुढीपाडवा का साजरा करतात आणि कश्या पध्दतीने केला जातो या बद्दल एक माहितीपर प्रेझेन्टेशनपण झाले. नंतर मग भोजन त्यात उल्लेख करावा ते म्हणजे कडु लिंबाच्या गोळ्या. 


              अश्याच पध्दतीने श्री गणेश उत्सव देखील साजरा करण्यात आला. त्या श्रींची ढोल ताश्याचा गजरात स्वागत आणि स्थापना. भाव आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम. विसर्जनाच्या दिवशी पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रसाद आणि मग पालखी मधुन ढोल ताशा आणि आपले पारंपरिक नृत्य लेझीम च्या गजरात भावनिक होवुन बाप्पा ला निरोप. नंतर दसरा दिवाळी पण मोठ्या उत्साहात.


              हे सगळं बघतां तडक एक गोष्ट जाणवली की आपण दुर जरी असलो तरी घरी असल्यासारखं आहोत आणि अवती भवती आपलीच मंडळी आहे.ह्यांचा सोबत असलो की आपलेपणा जाणवतो, हे उत्सव साजरे करतांना अभिमानही वाटतो तो मराठी असण्याचा आणि सातासमुद्रापार ही मराठीपण जिवंत असल्याचा. 


             या सगळ्यांचं श्रेय जातं ते एडींगबर्ग मधल्या मराठी मित्र मंडळाला आणि त्यातल्या सदस्यांना. मला भेटलेले श्री जितेंद्र पाटील, डाॅ. सचाणे, श्री निलेश जी आणि इतर लोकांनी आपली संस्कृती नव्हेच तर आपली भाषेलाही जिवंत ठेवलं होतं. प्रत्येक सण अगदी पारंपारीक मराठमोळ्या पध्दतीन साजरा करतात. बरेच लोक अनेक वर्षापासुन इथे आहेत त्यामुळे त्यांचा मुलांना आपली संस्कृती काय आहे या निमित्ताने हे सांगत असतात. या व्यतिरिक्त ही कला, कमरणुक यांचे ही आयोजन ह्या मंडळींकडून केले जाते. आपलेपण टिकवून ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न ही मंडळी करत असतात.


जाता जाता एकच सांगावेस वाटते..


   माझी भाषा मराठी,माझी माय मराठी

   हसलो मी मराठी, रडलो मी मराठी 

   अभिमान मला मी मराठी, स्वाभिमान मला मी मराठी

   जगलो मी मराठी,मरेल मी मराठी

   माझी भाषा मराठी,माझी माय मराठी

         ह्या आपल्या मराठी भाषेचे, मराठी संस्कृतीचे सातासमुद्रापार जतन करुन ठेवल्या बद्दल मराठी मित्र मंडळ एडींगबर्ग यांचे मनःपुर्वक धन्यवाद आणि भविष्याच्या वाटचाली साठी त्यांना खुप खुप शुभेच्छा. 

 

धन्यवाद, 

परेश वासुदेव पाठक

पुणे (धरणगांव)

Watsapp @(+ 91 9970663699)

०७-१२-२०१७